मानसोपचारतज्ञांना पहिल्यांदा भेटताय?
मानसोपचारतज्ञांना भेटताना ती भेट फलदायी ठरावी यासाठी काही काळजी घेणे व तयारी करणे गरजेचे असते. खालील यादीप्रमाणे तयारीने गेल्यास, चर्चा करताना गोंधळ होणे, किंवा महत्वाचा मुद्दा विसरणे असे होत नाही, तसेच, तुमच्या शंका, समस्या व गरजा या मानसोपचारतज्ञ डॉक्टरांना नीट समजतात.
या गोष्टी जरुर करा:
-
मानसोपचारतज्ञांसोबत चर्चा करताना मानसिक आरोग्य, आजार, लक्षणे या बाबतीत मोकळेपणाने, प्रामाणिकपणे व नि:संकोच पणे चर्चा करा. कोणतीही महत्वाची माहिती लपवू नका.
-
पूर्वी मानसोपचार घेतले असल्यास, किंवा सध्या सुरु असल्यास, संबंधित कागदपत्रे घेऊन या. काही कारणाने कागदपत्रे आणणे शक्य नसेल, तर किमान सुरु असणारे उपचार, औषधांचे तपशील, उपचारांची प्रगती ही माहिती सोबत असावी.
-
इतर कोणताही शारिरीक आजार, किंवा समस्या असेल व त्यावर उपचार सुरु असतील, तर त्याची माहिती द्यावी. जर अनेक कागद व फाईल असतील किंवा आणणे शक्य झाले नसेल, तर किमान सध्या सुरु असणारी औषधे, नुकतेच केलेल्या तपासण्यांचे रिपोर्ट इतके तरी सोबत आणण्याचा प्रयत्न करावा.
-
पूर्वीचा शारिरीक किंवा मानसिक आजार याचा आजपर्यंतचा प्रवास खूप मोठा किंवा गुंतागुंतीचा असेल, तर त्यातले महत्वाचे टप्पे याची नोंद एका कागदावर, किंवा मनाशी करुन ठेवा.
-
तपासणी व चर्चा पूर्ण झाल्यावर, रोग/समस्या निदान, उपचार, उपचारांमधील पर्याय व उपचारांची पद्धत यासंबंधीच्या सर्व शंका मानसोपचार तज्ञांशी चर्चा करुन सोडवून घ्या. शंका मोकळेपणाने विचारा. तुमच्या गरजा व तुमच्या अपेक्षा डॉक्टरांना मोकळेपणाने सांगा.
-
मानसोपचारतज्ञांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे औषधे व मानसोपचाराची सत्रे (psychotherapy) सुरु ठेवा. त्यात दिल्याप्रमाणे तयारी व बदल करत रहा.
-
मानसोपचारामध्ये संवाद हा अतिशय प्रभावी असतो. उपचार सुरु असताना, कशाचा फायदा होतो, कशाने फायदा होत नाही हे मानसोपचार तज्ञांना मोकळेपणे सांगा.
या गोष्टी करणे टाळा:
-
मानसिक आरोग्य किंवा आजार यांबद्दल बोलताना संकोच करु नका किंवा कमीपणा वाटून घेऊ नका.
-
मानसिक आजार व त्यावरील उपचार, हे इतर शारिरीक आजारांपेक्षा वेगळे असतात. त्याचे फायदे दिसायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे झटपट निकाल प्रत्येक वेळेस मिळेलच असे नाही. घाई करणे टाळा.
-
प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगळी असते. तुमच्या समस्या किंवा त्यांचे उपचार यांना इतरांसोबत तुलनात्मक रित्या पडताळू नका. मानसिक आरोग्याच्या दिशेने प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो.
-
मानसोपचार तज्ञांशी न बोलता अचानक उपचार किंवा औषधे बंद करु नका. तुम्हाला second opinion घ्यायाचे असेल तर तसे मोकळेपणाने सांगा व घ्या, जो तुमचा अधिकार आहे. पण उपचार अचानक बंद करणे, इतर कोणत्याही आजाराप्रमाणेच त्रासदायक ठरू शकते.
-
Contact
Manthan Neuropsychiatry Clinic
UG-6, Krystal Plaza, Opp Yellow Chilli Restaurant. Next to Gold's Gym. Tarabai Park, Kolhapur. Maharashtra. 416003
email: drsnehagore@gmail.com
Phone: +91-9930790433