top of page
Writer's pictureSneha Gore

भावनिक प्रथमोपचार (Emotional First Aid): आजची गरज.

Updated: Dec 2, 2023

प्रथमोपचार शिकणे हे काळाची गरज आहे. योग्य वेळेस केलेले प्रथमोपचार हे प्रसंगी जीव वाचवू शकतात. मनाला आणि भावनांना देखील प्रथमोपचार लागू शकतात. जाणून घ्यायचं असेल, तर चला वाचूया.

Counselling for emotional health and needs
First Aid: Vital in health

मनाला जखम होणे म्हणजे काय?

शरीराला इजा होण्याची करणं आपल्या सगळ्यांना माहिती असतातच. लागणे, पडणे, मार लागणे, आजारामुळे एखादा अवयव दुखावणे किंवा त्याचा दाह होणे, किंवा चुकीच्या सवयीमुळे शरीरात दोष निर्माण होणे, यामुळे इजा होते. मन मात्र असं वरवर नसल्यामुळे, शरीरसारखे इजा मनाला होत नाही. मनाला इजा होण्याची करणं वेगळीच असतात.

थोडंसं वाईट वाटणं, राग येणं, निराशा होणं हे रोजच्या जीवनात वारंवार होतंच असतं, पण आपलं मन खंबीर असतं आणि या छोट्या मोठ्या जखमा आपण पटकन विसरतो. उदाहरणार्थ; world cup ची फायनल मॅच हरल्यावर आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटलं, लोकांची खूप निराशा झाली. पण आपल्यापैकी बहुतेक सगळेच, हे विसरून दुसऱ्या दिवशी आपापल्या कामाला लागले. मात्र अनेकदा, आपण अशा काही परिस्थितीत सापडतो, की एखादी गोष्ट विसरणं, सोडून देणं, जखमेकडे दुर्लक्ष करणं मनाला शक्य होत नाही. अशा वेळेस काय करायचं?


मनाला इजा होण्याचं सगळ्यात महत्वाचं आणि गंभीर कारण म्हणजे मानसिक आजार. परंतु, मनाला इजा होण्याची अनेक इतर कारणं दैनंदिन जीवनात येतात, उदाहरणार्थ:

1) वैयक्तिक जीवनात किंवा कामाच्या ठिकाणी वाढलेला ताण-तणाव:

उदाहरण: प्रमोशन मिळाल्यावर पगार तर वाढला, पण वाढलेली जबाबदारी आणि घरातील जबाबदारी यांची सांगड घालत येत नाही त्यामुळे आलेला ताण.


2) नाते-संबंधात आलेला दुरावा, किंवा हरवलेला जिव्हाळा.

उदाहरण: विविध करणांमुळे दूर गेलेली माणसं, निर्माण झालेले गैरसमज, त्यातून रोजच्या जगण्यात निर्माण होणाऱ्या अडचणी, अपेक्षा आणि त्या पूर्ण/अपूर्ण राहिल्यामुळे निर्माण होणारी निराशा. ही घर किंवा ऑफिस किंवा मित्र या कोणत्याही नात्यात होऊ शकते.


3) सतत येणाऱ्या समस्या किंवा प्रयत्न करूनही न मिळालेला अपेक्षित परिणाम.

उदाहरण: एखादं प्रमोशन, किंवा एखाद्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी वारंवार केलेले प्रयत्न वाया जाणे, किंवा, एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी खूप कष्ट किंवा प्रयत्न केल्यानंतर देखील त्या व्यक्ती कडून हवा तसा response किंवा साथ न मिळणे.


3) अचानक आलेलं मोठं संकट, किंवा बसलेला मोठा धक्का.

उदाहरण: परीक्षेची पूर्ण तयारी झाली, अभ्यास छान झालाय, पण परीक्षेच्या आदल्या दिवशी अचानक आलेलं आजारपण, किंवा अचानक जवळच्या व्यक्तीचा झालेला मृत्यू, अनपेक्षित झालेलं आर्थिक नुकसान.


4) अचानक झालेला अपेक्षाभंग. हा इतर लोकांकडून होतो, किंवा कधी कधी स्वत;कडून देखील होतो.

उदाहरण: एखाद्याला मदत केली, पण तुमच्या अपेक्षेनुसार त्याने त्याची परतफेड केली नाही. किंवा, तुमच्याकडून एखादी चूक झाली, ज्यामुळे तुमचं, किंवा दुसऱ्याच नुकसान झालं.


5) एकटेपणा.

उदाहरण: आयुष्यभर खूप काम केल्यावर आणि अॅक्टिव राहिल्यानंतर निवृत्त होताना त्या रिकामेपणाची किंवा एकटेपणाची सवय नसणे. किंवा, आपल्या अपेक्षेप्रमाणे इतर माणसांचं लक्ष, प्रेम किंवा मदत न मिळाल्यामुळे जाणवणारा (पण प्रत्यक्ष नसणारा) एकटेपणा.


मनाला झालेली जखम किंवा इजा ओळखायची कशी?

शरीराचे इतर भागाला जेव्हा जखम किंवा इजा होते, ती दिसते, म्हणजे खरचटतं, खपली पडते, रक्त येतं, ती जागा दुखते. पण मन हे मेंदूच्या आत असतं त्यामुळे त्यात होणारे बदल, त्याला होणारी इजा ही दिसत नाही, पण त्याची चिन्हं आपल्या वागण्यातून जाणवतात. त्यातली काही लक्षणे खालीलप्रमाणे:

1) अचानक वागण्यात झालेला, आणि टिकून राहिलेला बदल.

2) अचानक आणि कोणत्याही कारणाशिवाय भूक किंवा झोप या महत्वाच्या शारीरिक क्रियेत झालेली वाढ किंवा घट.

3) काम, अभ्यास, छंद, नातेसंबंध, किंवा आवडीच्या गोष्टी यातला रस आणि उत्साह कमी होणे.

4) आपल्या भावना, विशेषत:, दु:ख, राग आणि निराशा यांच्यावर ताबा न राहणे.

5) अभ्यास, कामकाज, खेळ यातील प्रगती किंवा कामाचा दर्जा अचानक खालवणे.


प्रत्येक वेळेस हीच लक्षणे असतील असं नाही, किंवा यातील एकच लक्षण असेल असेही नाही. बहुतेक लोकांमध्ये, यातील काही लक्षणे कमी अधिक प्रमाणात, आणि एकाच वेळेस आढळून येतात.


मनाला इजा झाल्यावर प्रथमोपचारची (Emotional First Aid) गरज का भासते?

शारीरिक प्रथमोपचारा प्रमाणेच, मानसिक प्रथमोपचार खालील गोष्टीसाठी गरजेचा आहे.


1) जखमेवर फुंकर घालणे (मानसिक त्रास कमी करणे)

पुष्कळ वेळेस, आपल्याला होणारा त्रास हा मानसिक कारणामुळे आहे , हे पटकन व्यक्तीच्या लक्षात येत नाही. याचं कारण, हे लक्षात आणून देणारं मन हेच मुळात दुखापत ग्रस्त झालेलं आहे. जर एखाद्याच्या डोळ्याला इजा झाली, तर त्याला समोरचं स्पष्ट दिसेल अडचण येईल, त्याच प्रमाणे, जर मन दुखापतग्रस्त असेल, किंवा आजारी असेल, तर त्याचं काम (विचार करणे, अडचणीतून मार्ग शोधणे, भावनांचे नियंत्रण करणे) हे ते नीट करू शकणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम, मनाला होणारा त्रास कमी करणे गरजेचे असते.


2) लक्ष वळवणे.

लहान लहान मुलं, खेळताना पडतात, पुष्कळ वेळेस त्यांना लागत नाही. पण ती भीतीमुळेच रडायला लागतात. त्यांना जरा हसवलं, किंवा लक्ष वळवलं की रडायची विसरून जातात. क्रिकेट खेळताना, खेळाडू बॉल अडवताना, दाईव्ह मारतात, कसाही पडून कॅच घेतात, पण खेळाच्या भरात त्या जखमेकडे, दुखण्याकडे दुर्लक्ष करू शकतात कारण मन आणि मनाचं लक्ष दुसरीकडे फोकस केलेलं असतं. तसंच, मानसिक इजा होऊन लक्षणे दिसताना, त्या व्यक्तिचं पूर्ण लक्ष आणि मानसिकता या त्या समस्येकडे असते, तिचं लक्ष वळवणं गरजेचं असतं, हे सगळं करण्यासाठी मानसिक प्रथमोपचार गरजेचा ठरतो.


3) भावनांचा निचरा करणे (Emotional Venting)

विचार करणे, उत्तर शोधणे, समस्या सोडवणे हे सगळं करण्यासाठी मानसिक शांतता गरजेची असते. मन स्थिर आणि केंद्रित असणे गरजेचे असते. परंतु आपण जेव्हा अडचणीत असतो, आपल्याला त्रास होत असतो, तेव्हा मनात भावनांचं वादळ तयार होतं, आणि या भावना नीट विचार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात. त्यामुळे, बऱ्याच वेळेस, एखाद्या प्रश्नाचं, अडचणीचं उत्तर अगदी समोर असतं, सोपं असतं, तरी आपल्याला ते दिसत नाही, किंवा दिसलं तरी पटकन मान्य होत नाही. भावनिक प्रथमोपचार केल्या मुळे, या भावनांचा निचरा होऊन जातो. तो झाल्यामुळे मनावरचं ओझं कमी होतं, काहीसं बरं आणि relaxed वाटू लागतं, आणि त्या नंतर, त्या परिस्थिती वरील उत्तर शोधण्याची प्रक्रिया सुरू होते.


4) मानसिक आधार देणे (Emotional Support)

इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की आधार आणि मदत या मध्ये खूप फरक आहे. अनेकदा, अडचणीत असलेल्या माणसाला, किंवा काही सहन करत असलेल्या माणसाला प्रत्यक्ष मदत नको असते, तर फक्त आधार आणि भावनिक निचरा हवा असतो. ते काम भावनिक प्रथमोपचार करतात. या आधारांचा वापर करून ती व्यक्ती पुनः उभी राहते, दु:ख विसरते आणि मार्ग काढायचा प्रयत्न करते.


भावनिक प्रथमोपचार कोण करू शकते?

हे सर्व वाचल्यावर असं वाटू शकतं, की "मी काही counsellor किंवा psychiatrist किंवा therapist नाही! मग मी हे सगळं कसं करायचं?" किंवा, "हे करण्यासाठी मला काही वेगळं शिक्षण किंवा डिग्री घ्यावी लागेल का?"

तर मंडळी, याचं स्पष्ट उत्तर म्हणजे, भावनिक प्रथमोपचार कुणीही करू शकतं. पटत नाही ना? प्रथमोपचार आपल्या घरातील आई, आजी, इतर मंडळी आपल्यावर करत आलेच आहेत लहानपणापासून, कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील. आज काल, cardiac arrest झाल्यावर जीव वाचवणारी cardiopulmonary rescucitation (cpr) ही उपचार पद्धती शाळा, जीम, एयरपोर्ट, हॉटेल इथे काम करणाऱ्या लोकांना शिकवली जाते, आणि तिचा वापर करून लोकांनी अगदी रस्त्यावर, पोहताना cardiac arrest आलेल्या लोकांचे जीव वाचवले आहेत. तर मग भावनिक प्रथमोपचार तुम्हाला नक्की जमेल.

फक्त, तो करण्यासाठी, काही गोष्टी शिकाव्या लागतील, काही गोष्टी तुम्हाला नक्कीच आधीपासून येत असतील, त्याची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल आणि सर्वात महत्वाचं, भावनिक प्रथमोपचार करण्याची तुमची मानसिक तयारी आणि ताकद तुम्हाला कमवावी आणि टिकवावी लागेल.


भावनिक प्रथमोपचार: आहात तयार?

भावनिक प्रथमोपचाराची ही अगदी जुजबी माहिती आहे. हा प्रथमोपचार कसा करायचा आणि काय काळजी घ्यायची हे वाचू पुढील भागात. तोपर्यंत, नमस्कार.




24 views0 comments

Comments


bottom of page