top of page
Writer's pictureSneha Gore

बालक आणि पालक आणि आव्हाने: 1 (Parenting and child psychology:1)

Updated: May 20, 2023


"आम्ही मुलांना खूप समजून घेतो. तरी ती मुद्दाम अशी वागतात, काय करायचं ते कळत नाही."

"आमच्या घरात अजिबात प्रेशर नाही. एकदम फ्री वातावरण आहे. तरी प्रॉब्लेम आहे."

" मी खरं तर एकदम व्यवस्थित आहे. बाकीचे लोक लाड करून बिघडवतात."



Child behaviour problems, psychology Kolhapur
Parenting and Child Psychology

मुले व त्यांच्या मधील वागण्यातील समस्या (child psychology issues and problems), दोष मानसिक आरोग्य विषयक बाबी या बाबतीत काम करताना पालकांकडून (parenting) अशी वाक्ये नेहमी उच्चारली जातात. या समस्यांशी झुंजणारे पालक शहरी आहेत तसेच ग्रामीण आहेत. गृहिणी आहेत, तशाच डॉक्टर व पोलिस ही आहेत. ही समस्या केवळ 1-2 कुटुंबापुरती नसून आपण सगळेच त्याला सामोरे जातोय.


21 व्या शतकात पालकत्व अवघड होत आहे का?

पालकत्व हे नेहमीच अवघड राहिलेलं आहे, किंबहुना ते अवघडच आहे. फरक इतकाच की काळ पुढे जाईल तसे ते किती अवघड आहे याची जाणीव आपल्याला नव्याने होते, याची करणे पुढीलप्रमाणे:

  1. कुटुंब पद्धती मधील बदल: पूर्वी असणारी एकत्र कुटुंब, त्यामुळे मुलांना काही फायदे आपोआप मिळत असत:

    1. घरातील समवयस्क इतर मुले व भावंडे यांची सोबत व खेळगडी. यामुळे मुलांचा वेळ आपोआप चांगला जात असे, व जास्त मुले असल्याने खेळ देखील एकत्र मिळून खेळण्याचे असत.

    2. एकत्र खेळल्याने, व खेळण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागे. त्यामुळे त्या मुलाची किंवा मुलीची मर्जी सांभाळणे हे देखील गरजेचे असे. उदा: जर खेळताना बॅट एकाच मुलाकडे असेल, तर त्याला नाराज न होऊ देणे हे सगळ्यांना करावे लागे .

    3. ग्रुप मध्ये राहिल्याने ग्रूप चे नियम पाळणे, शिस्त पाळणे या गोष्टींची सवय आपोआप लागत असे.

    4. ग्रुप मधील बहुतांश खेळ हे पळपळी चे, मैदानी असत. त्यामुळे शरीराला हालचाल असे, लावचिकता मिळे. त्यामुळे लहान मुलामध्ये असणारी नैसर्गिक ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च होत असे. याचा फायदा म्हणजे योग्य वेळी झोप, भूक या गोष्टी लागत असत.

    5. सगळ्या सोबत राहिल्याने, घरातील खाऊ, खेळणी या गोष्टी इतरांसोबत वाटून घेण्याची सवय आपोआप लागत असे.

    6. या सर्व गोष्टीमुळे, मुलांना, "मनाविरुद्ध गोष्टी घडणे", "कंटाळा येणे", "सर्व लोकांसोबत मिळून मिसळून व तडजोड करून वागणे" याचं शिक्षण घरबसल्या मिळत असे.

  2. कुटुंब पद्धती मधील बदल: पूर्वी असणारी एकत्र कुटुंब, त्यामुळे पालकांना काही फायदे आपोआप मिळत असत:

    1. पालक काही कामात जरी असतील, तरी घरातील इतर व्यक्ती, जसे आजी आजोबा, काका, मावशी यांचे लक्ष मुलांकडे असे. पालकत्व काही प्रमाणात विभागले गेलेले होते. हे इतके सर्वमान्य होते, की मुलाला अनेकदा आई वडिलांपेक्षा इतर नतेवाईकांचा लळा लागत असे, "माय मरो मावशी जगो" ही म्हण त्यातूनच आलेली आहे.

    2. अनेकदा आपल्याच मुलांचे दोष आपल्याला दिसत नाहीत. अशा वेळेस, घरातील इतर व्यक्ती अगदी स्पष्टपणे व प्रेमाने हे दोष दाखवून देत. यातून अनेकदा रूसवे फुगवे होत असत, पण पालकांना आपल्या मुलाबाबत खरी परिस्थिति समजत असे.

    3. मुले बहुतेक वेळेस स्वत; खेळत व इतर भावंडा सोबत रमत. मुलांचा वेळ घालवण्यासाठी काय करायचं हा विचार पालकांना करायला लागत नसे.

    4. वर दिल्याप्रमाणे बहुतांश खेळ हे मैदानी, फारसे साहित्य न लागणारे व साधे होते. महागडे खेळ किंवा त्याचा आर्थिक बोजा पालक व घरावर फारसा पडत नसे.

याचा अर्थ एकत्र कुटुंब पद्धती अगदी निर्दोष होती, व परिपूर्ण होती असे अजिबातच नाही. किंबहुना, त्यात दोष होते, म्हणूनच तर आजची विभक्त पद्धती निर्माण झाली व वाढली! पण एकत्र कुटुंब असण्याचे हे फायदे नाकारता येणार नाहीत, जे आज मिळणे काहीसे अवघड झालेले आहे.


याचा अर्थ पालकांनी पुन्हा एकत्र कुटुंबासाठी प्रयत्न करावा, इ्च्छा नसतानाही, व नाती तितकी जवळीकीची नसताना जबरदस्तीने एकत्र family मध्ये रहावे असे बिलकुल नाही. जगभरात, करोडो nuclear family मधील पालक आपल्या मुलांना उत्तम रितीने वाढवत आहेत, व राहतील! एकत्र राहून देखील नंतर एकमेकांची तोंडं न बघणारी भावंडं समाजात लाखोंच्या संख्येने आहेतच! दोन्ही पद्धतींचे आपापले फायदे व मर्यादा आहेतच.


त्यामुळे, पद्धत कोणतीही असेल, पालक ती किती योग्य रितीने वापरतात यावर पालकत्वाचे यश अवलंबून असते.


पालकत्व हे अवघड का वाटते, व त्यात समस्या व अडचणी का येतात, या मालिकेतला हा पहिला लेख. पुढील लेखासाठी हा ब्लॉग वाचत रहा.





66 views0 comments

Kommentarer


bottom of page