डॉक्टर, बोलणं खूप सोपं आहे. तुमचे सगळे मुद्दे मान्य आहेत.
१. मग मुलांना मोबाईल किंवा सोशल मीडिया द्यायचाच नाही का?
२. मुलं आजूबाजूला सगळं बघत असतात, त्यांच्या मित्रांशी बोलत असतात. त्यांना दडपून कसं ठेवणार?
लक्षात ठेवा:
१. सोशल मीडिया किंवा मोबाईल वाईट नाहीत. चुकीचा वापर किंवा चुकीच्या वेळेस केलेला वापर (smartphone addiction in children) ही समस्या आहे.
२. सोशल मीडिया वर बहुतेक ठिकाणी वय 13 असण्याची अट आहे. त्यामुळे जर मुले हा मीडिया वापरत असतील, तर त्यांनी मुळातच त्या प्लॅटफॉर्म वर असण्याची अट पाळलेली नाही. मुलं 13 वर्षाच्या आत असतील, तर account उघडण्यासाठी त्यांना खोटं वय दाखवावे लागेल हे उघड आहे, जे मुळातच एक बेकायदेशीर कृत्य आहे.
३. सोशल मीडिया हे bidirectional communication आहे. म्हणजेच, तुम्ही जे बघता, वाचता, ऐकता त्याला तुम्ही लाईक करणे, सबस्क्राईब करणे, कॉमेंट करणे अशा गोष्टी करून त्यात सहभागी होत असता. टीव्ही बघत असताना असे होत नाही. त्यामुळे सोशल मीडिया वर केलेली प्रत्येक कृती याची थेट जबाबदारी वापरणाऱ्या व्यक्तीवर येते.
काय करायचं?
आपल्यासाठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या मुलासाठी काय योग्य आहे, सुरक्षित आहे याचा विचार करा. एकदा का निर्णय घेण्याची ही पॉलिसी ठरवली की पुढचे सगळे निर्णय घेणे अगदी सोपे व सहज होऊन जाते. बहुतेक वेळेस निर्णय होत नाहीत किंवा चुकीचे ठरतात, कारण निर्णय घेण्याचे धोरण ठरलेले नसते. त्यामुळे पालक बहुतेक निर्णय हे भावनेच्या आहारी जाऊन घेतात. ही भावना म्हणजे भीती:
१. मी मुलाला नाही म्हणालो तर त्याला वाईट वाटेल.
२. त्याचे मित्र सोशल मीडिया वापरतात, तो वापरत नाही. तो एकटा पडला तर? तो मागे पडला तर?
३. शेजारी पाजारी, नातेवाईक काय म्हणतील?
4. मुलाला नाही म्हणालो आणि त्याने काही टोकाचं पाऊल उचललं तर?
ही भीती मुलांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यापासून पालकांना थांबवते. बहुतेक वेळेस पालकांना योग्य निर्णय माहिती असतो, पण तो घेण्याची आणि राबवण्याची भीती त्यांना वाटत असते.
सोशल मीडिया वापरणे ही मुलांना मिळालेली सवलत किंवा एक चैन आहे. तो त्यांचा अधिकार नव्हे. मुळात बेकायदेशीर असलेली गोष्ट मागणे हेच चुकीचे आहे. तरी पालकांना मुलांच्या हातात सोशल मीडिया द्यायचाच असेल, तर खालील काळजी घ्यावी.
10 वर्षाच्या वयापर्यंत
१. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की मुलांचा स्क्रीन टाईम किती असावा याची मार्गदर्शक तत्वे आधीच उपलब्ध आहेत. यातील काही महत्वाची उदाहरणे म्हणजे
1) भारतीय मानसोपचार संघटना यांनी दिलेली मार्गदर्शक तत्वे: ही वाचण्यासाठीची लिंक या ब्लॉग च्या शेवटी दिलेली आहे.
2) अमेरिकन बाल आणि पौगंडावस्थेतील मानसिक आरोग्य संस्था यांनी दिलेली मार्गदर्शक तत्वे: ही वाचण्यासाठी लिंक ब्लॉग च्या शेवटी दिलेली आहे.
पहिलं म्हणजे, वयाची पहिली 2 वर्षे मुलाच्या हातात किंवा नजरेसमोर कोणत्याही कारणासाठी स्क्रीन देऊ नका. पहिल्या 2 वर्षात अशी कोणतीही गरज मुलांना नसते जी पुरी करण्यासाठी त्यांना स्क्रीन लागेल. अजून १ गोष्ट लक्षात ठेवा: पहिली 2 वर्षे मुले खऱ्या अर्थाने पालकांवर अवलंबून असतात. तुमच्या मदतीशिवाय ती चालू देखील शकत नाहीत. या वयात त्यांना योग्य ती शिस्त लावणे अगदी सहज शक्य आहे. 2 ते 5 वर्षांच्या मुलांना स्क्रीन फक्त एखाद्या नातेवाईका सोबत व्हीडियो कॉल करणे या कारणपुरता द्यावा.
2. वयाची पहिली 5-6 वर्षापर्यंत मुलांकडे वडीलधारे व्यक्ती सोबत असल्याशिवाय स्क्रीन वापरायला देऊ नका. म्हणजेच, आई-वडील त्यांच्या कामात व्यस्त आहेत, आणि मूल त्याच्या हातात मोबाईल घेऊन त्याच्याशी खेळत आहे अशी परिस्थिति येऊन देऊ नका. वय 3ते 5 पर्यंत स्क्रीन टाईम दिवसभरात जास्तीत जास्त अर्धा तास राहील याची काळजी घ्या.
कोणत्याही परिस्थितीत, जेवण्यासाठी लालूच म्हणून किंवा पटकन जेवावे म्हणून किंवा नावडता पदार्थ पटकन खावा म्हणून जेवताना समोर स्क्रीन ठेवू नका. असे केल्याने
इतर प्रत्येक नावडते काम करताना मुले स्क्रीन मागण्याची शक्यता आहे.
अनेकदा मित्र, नातेवाईक यांच्या सोबत जेवण्याच्या वेळेस, मोबाईल वर अवलंबून जेवण हे समस्या निर्माण करू शकते.
जेवताना मोबाईल मिळतो हे मुलाला समजल्यावर ते मुद्दाम हळू हळू जेवण्याची शक्यता असते, जेणेकरून जास्त वेळ स्क्रीन बघायला मिळेल.
10 वर्षाच्या वयाच्यानंतर ते 18 वर्षापर्यंत
मुलांकडे त्यांचा स्वतः चा असा मोबाईल (स्मार्टफोन) असू नये. अनेक पालक कौतुकाने, किंवा बऱ्याच वेळेस आपली आर्थिक परिस्थिती मिरवण्यासाठी मुलांना स्मार्टफोन घेऊन देतात. बऱ्याचदा ही, चांगले मार्क मिळाले म्हणून दिलेले बक्षीस असते. अनेक मुलांकडे स्वतः चा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असतो, टॅब असतो. सर्वप्रथम, मुलाला शाळेत मिळालेले मार्क आणि मोबाईल हे बक्षीस अशी सांगड घालू नका. शाळेतील परीक्षेचे मार्क कितीही चांगले असले, तरी त्यासाठी 30-40 हजाराचा मोबाईल घेऊन देणे हे अजिबात लॉजीकल बक्षीस नाही.
आजकाल अनेक शाळा अभ्यास किंवा assignments online पाठवतात. या एका कारणासाठी मुलाकडे वेगळा फोन देण्याची काही गरजच नाही. रोज ठरलेल्या वेळात दिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुमचा फोन मुलाकडे द्या. वेळ पूर्ण झाली की काढून घ्या. जर मुलाला कॉम्प्युटर द्यायचाच असेल तर तो शक्यतो डेस्कटॉप द्या, लॅपटॉप नको. कॉम्प्युटर वापरताना तो घरातील बैठकीच्या खोलीत किंवा हॉल मध्ये वापरण्याचा नियम करा. खोलीत जाऊन दरवाजा बंद करून मोबाईल, कॉम्प्युटर किंवा सोशल मीडिया वापरण्यावर प्रतिबंध करा.
शक्यतो कायद्याने सज्ञान न झालेल्या मुलांना सोशल मीडिया वर येणे, अकाऊंट उघडणे याची परवानगी देऊ नका, पण ती जर द्यावी लागलीच किंवा द्यायची असेलच, तर मुलांनी तो वापर तुमच्या फोन वर आणि तुमच्या अकाऊंट वर जाऊनच केला पाहिजे हे बंधन घाला. मुलांकडे असलेला मोबाईल अगर कॉम्प्युटर कोणत्याही वेळेस उघडण्याची सोय तुमच्याकडे असली पाहिजे, या बाबतीत कोणतीही privacy, किंवा secrecy पाळली जाणार नाही ही अट घालूनच मोबाईल किंवा कॉम्प्युटर मुलांना द्या. हे नियम राबवताना काही अडचणी येतील, त्या कशा सोडवायच्या हे आपण पुढील लेखात पाहू.
एक गोष्ट ध्यानात ठेवा:
मोबाईल, तो वापरण्याची गुपिते, क्लुप्त्या जाणून घेण्याचा वेळ व इच्छा पालकांकडे तितकी असेलच असे नाही. तसेच या गोष्टी शिकवणारे "गुरु" पालकांना सापडतीलच असेही नाही. अनेक पालक अगदी साध्या गोष्टी, जसे लॉक करणे, अनलॉक करणे, कॅमेरा वापरणे साठी मुलांवर अवलंबून राहतात. पालकांना हे शिकवता शिकवता मुलं पारंगत होतात, पालक मात्र होते तिथेच राहतात. मुलांना हे सगळं शिकण्याचा वेळ असतो, आणि शिकवणारे मित्र-मैत्रिणी ही असतात. मुलांच्या मोबाईल वापरण्याच्या कौशल्याचे पालकांनी केवळ गोडवे गाऊ नये, तर त्याकडे बारीक लक्ष ठेवा.
पुणेकर होण्याबाबत पुलं म्हणतात "तुम्हाला पुणेकर व्हायचंय का? आधी विचार करा. जर विचार पक्का असेल, तर मग कंबर कसून तयारी केली पाहिजे. एकदा तयारी झाली, की मग मजा आहे." हेच वाक्य उचलून आपण म्हणू: "तुम्हाला मुलांना मोबाईल द्यायचाच आहे का? जरा विचार करा. जर विचार पक्का झालाच असेल, तर मग कंबर कसून आणि मनावर दगड ठेवून तयारी केली पाहिजे. एकदा तयारी झाली, की मग डोक्याला शांतता आहे."
सारांश आणि मुलांना मोबाईल आणि मीडिया सोबत ओळख करून देताना ही तयारी करा:
१. घरातील सर्व लोकांनी एकत्र येऊन, मुलाच्या मोबाईल वापराचे नियम व धोरण निश्चित करा. ते सर्वांना पाळावे लागेल याची कल्पना द्या. पालक पक्षात एकी नसेल तर मुले त्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊ शकतात.
२. मुलाला मोबाईल देताना तो मोबाईल वापरण्याचे कौशल्य स्वतः शिकून घ्या. मोबाईल मूल लॉक करू शकणार नाही, किंवा केला तरी तुम्ही तो कधीही अनलॉक करू शकाल इतपत तुम्ही तरबेज होणे आवश्यक आहे.
३. मोबाईल देताना, काय योग्य काय अयोग्य, या एकाच कसोटीवर तुमचे निर्णय घ्या. लोक काय म्हणतील, इतर मुले काय करतात या निकषावर तुमच्या घरातील निर्णय घेऊ नका.
४. मुलाला मोबाईल देताना हे सर्व नियम त्याला नीट समजावून सांगा. शक्यतो एका कागदावर ते लिहून तो कागद घरात सर्वांना दिसेल असा लावून ठेवा. मोबाईल तुम्ही मुलाला देत आहात (ती एक सवलत आहे, चैन आहे), त्यामुळे तुम्ही घातलेले नियम पाळणे हे बंधनकारक आणि तडजोड न होणारे आहे हे अगदी शांतपणे, स्पष्टपणे, निग्रहाने आणि ठामपणे सांगा.
(सोशल मीडिया संदर्भात काही विशेष नियम करावे लागतील, जेणेकरून कोणतीही कायदेशीर समस्या उद्भवणार नाही. सोशल मीडिया वरील वापर हा फक्त एखाद्या फॉलो करणे, रील पाहणे इतपतच राहील हे पहा. कोणत्याही परिस्थितीत, private message करणे, स्वतः चे फोटो पाठवणे, किंवा दुसऱ्याचे फोटो मागवणे हे होऊ देऊ नका.)
५. नियम मोडल्यास काय दंड होईल हे देखील एकत्र बसून ठरवा आणि लिहून ठेवा. अंदाजाने किंवा रागाच्या भरात केलेला दंड किंवा शिक्षा कधीच प्रभावी ठरू शकत नाही.
६. जर नियम मोडला गेला, तर तो शांत पणे, थंड डोक्याने आणि भावनेच्या आहारी न जाता दाखवून द्या, आणि ठरलेला दंड कोणताही अपवाद न बाळगता वसूल करा.
हे सगळं करताना अडचणी येणार का? तर नक्की येणार. आपल्या मुलाला इतक्या शिस्तीत वाढवायचं, आणि इतके नियम लावायचे हे थोडंसं जड जाणारच आहे! घरातले आणि आजूबाजूचे दबावगट तुम्हाला पुन्हा पुन्हा विचार करायला लावणारंच आहेत. त्यातून मार्ग कसा काढायचा? वाचू पुढच्या भागात!
पालकांसाठी इतर माहिती:
1) American Academy Of Child And Adolescent Psychiatry Guidelines.
2) Indian Psychiatric Society Guidelines.
https://indianpsychiatricsociety.org/wp-content/uploads/2020/06/E-Booklet-RECOMMENDATIONS-FOR-SCREEN-USE.pdf
Manthan Neuropsychiatry Clinic
UG-6, Krystal Plaza, Besides Gold Gym Circuit House Road, opp. Yellow Chilli Restaurant, Tarabai Park, Kolhapur, Maharashtra 416003
Comentarios